
महाराष्ट्रात असलेल्या अनेक समस्यांपैकी बालविवाह ही एक मोठी गंभीर सामाजिक समस्या आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त बालविवाहाचे प्रमाण हे मराठवाड्यात असून बालविवाहाच्या बाबतीत नांदेड जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण ५ नुसार (NFHS 5) नांदेड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण ३२.२% आहे.
बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ-SBC३ मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम गेली चार वर्षापासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.
बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ विषयी थोडक्यात :-
- बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार २१ वर्षाच्या आत मुलाचा आणि १८ वर्षाच्या आत मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.
- कायद्याने ठरवून दिलेले विवाहाचे योग्य वय – मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- विवाहाच्या वेळी मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी कोणत्याही एका पक्षाचे वय कायद्याने ठरवून दिलेल्या वयापेक्षा कमी असेल तर असा विवाह हा बालविवाह ठरविला जातो.
बालविवाह प्रतिबंधासाठी बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा :- पंचायत विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग या पाच विभागांचा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला.
शिक्षेची तरतूद :-
२ वर्षापर्यंत सक्त मजूरी आणि १ लाख रुपया पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद केली आहे.
शिक्षा कोणासाठी – विवाह जुळविणारे मुलीचे, मुलाचे पालक, नातेवाईक, नवरदेव मुलगा,प्रिंटींग प्रेस(पत्रिका छापणारे), लग्न लावणारे, कँटरसवाले, मंगल कार्यालय व्यवस्थापक, धार्मिक स्थळाचे व्यवस्थापक, मंडप डेकोरेशन, फ़ोटोग्राफर, लग्नात उपस्थित सर्व मंडळी तसेच विवाहाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांवर कार्यवाही केली जाते.
बालविवाह प्रतिबंध अधिकारी :-
- ग्रामीण भागासाठी –
- ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) – बालविवाह प्रतिबंध अधिकारी
- अंगणवाडी सेविका – सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी
- शहरी भागासाठी –
- बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) – बालविवाह प्रतिबंध अधिकारी
- अंगणवाडी पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) – सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी
बालविवाह थांबविण्यासाठी यंत्रणा :–
१.बालविवाह प्रतिबंध अधिकारी
२. गाव/वॉर्ड बाल संरक्षण समिती
३. पोलीस प्रशासन
४.चाईल्ड हेल्पलाईन १०९८
५.तालुका बाल संरक्षण समिती
६.जिल्हा बाल संरक्षण कक्ष
७.कोणीही सुज्ञ नागरिक चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक १०९८ ला कॉल करून होणाऱ्या बालविवाहाची माहिती देवून होणारा बालविवाह थांबवू शकतो, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्प लाईन १०९८ द्वारे थांबविण्यात आलेले बालविवाह पुढीलप्रमाणे :-
जानेवारी २०२३ ते ऑक्टोंबर २०२५
| तालुका | वर्ष | |||
| २०२३ | २०२४ | २०२५ | एकूण | |
| नांदेड | ४ | ७ | ७ | १८ |
| अर्धापूर | ० | ७ | ३ | १० |
| लोहा | १ | ८ | ५ | १४ |
| कंधार | २ | ३ | २ | ७ |
| नायगाव | १ | १ | ३ | ५ |
| बिलोली | ० | २ | ५ | ७ |
| हदगाव | ० | ५ | १ | ६ |
| हिमायतनगर | ० | ३ | २ | ५ |
| किनवट | ० | ४ | २ | ६ |
| माहूर | ० | ७ | २ | ९ |
| देगलूर | ० | २ | १ | ३ |
| उमरी | ० | ५ | २ | ७ |
| धर्माबाद | ० | ४ | ५ | ९ |
| भोकर | १ | २ | १ | ४ |
| मुखेड | ० | ८ | २ | १० |
| मुदखेड | ० | २ | ३ | ५ |
| एकूण | ९ | ७० | ४६ | १२५ |
सर्वांनी आता ठरवूया, बालविवाहाला हरवूया…!