बंद

जिल्ह्याविषयी

आपल नांदेड.
नांदेड हे महाराष्ट्र राज्यातलं दहावं सर्वात मोठं शहर आहे आणि भारतातील ७९ वं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. हे नांदेड जिल्ह्याचं मुख्यालय आहे. मराठवाड्यातलं सर्वात मोठं शहर. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या पश्चिमेला लातूर जिल्हा, परभणी जिल्हा व हिंगोली जिल्हा व उत्तरेला यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेला तेलंगणा राज्यातले निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल आणि आदिलाबाद जिल्हे आणि दक्षिणेला कर्नाटक राज्यातला बिदर जिल्हा आहे.
नांदेडचे दोन भाग आहेत. जुनं नांदेड (२०.६३ चौरस किलोमीटर) गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर आहे; नवीन नांदेड, नदीच्या दक्षिणेला (३१.१४ चौरस किलोमीटर) आहे. हा भाग वाघाळा आणि आजूबाजूचा परिसर व्यापतो. नांदेडच्या उत्तरेला १५० किलोमीटर (९३ मैल) अंतरावर असलेल्या वाशिम इथं सापडलेल्या एका ताम्रपटावरून पुरातत्वशास्त्रज्ञांनी हे नांदेड शहर पूर्वी नंदिता म्हणून ओळखलं जात असे असं अनुमान काढलं आहे. याचं दुसरं नाव नंदीग्राम होतं. नांदेड हे नाव शिवाचं वाहन नंदीपासून विकसित झाल्याचं लोककथा सांगते. शिवानं गोदावरी नदीच्या काठावर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. हे नंदी-तट नंतर नांदेड झालं. नांदेडचा उल्लेख महाभारतात भारत राजाच्या आजी-आजोबांचं स्थान असा आहे. इ.स.च्या पहिल्या शतकात, या भागातील सत्ता आंध्रभृत्य आणि सातवाहनांकडं होती. ख्रिस्तपूर्व ५ व्या आणि चौथ्या शतकात नांदेडवर नंद घराण्याचं राज्य होतं. तिसर्‍या शतकात (२२७ ते २३१ ईसापूर्व) हा अशोकाच्या अंतर्गत मौर्य साम्राज्याचा भाग होता. स्थानिक सिंचन पद्धतीची आणि स्वतः नांदेडची नोंद लीळाचरित्र (१२०० च्या दशकाच्या उत्तरार्धात) या ग्रंथात आहे. नांदेड हे तीन मराठी पंतकवी विष्णुपंत शेसा, रघुनाथ शेसा आणि वामन पंडित यांचं जन्मस्थान आहे.
कंधार येथे असलेल्या कंधार किल्ल्याचं बांधकाम, दहाव्या शतकाच्या आसपास राज्य करणाऱ्या मालखेडाचा राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यानं बांधल्याचं म्हटलं जातं.
१६३६ पासून नांदेड हे हैदराबादच्या निजामाच्या सुभेदारीत होतं. त्यात सध्याचं तेलंगणा आणि कर्नाटक समाविष्ट होतं. आणि मुघल सम्राट शाहजहानचा हा शाही प्रांत होता. १६५७ मध्ये नांदेडचं बीदर सुभ्यात विलीनीकरण झालं.
संत श्री नामदेव ( १२७०-१३५०)
नरसी ते पंढरपूर प्रवासास जात असताना गोदातीरी स्नान वास्तव्य करून पुढील प्रवास केलता अस म्हटलं जातं.
गुरू नानक .(१४६९-१५३९) श्रीलंकेला जाताना नांदेडमधून गेले. गुरू गोविंद सिंग (१६६६-१७०८) हे १७०७ मध्ये ऑगस्टच्या अखेरीस मुघल सम्राट बहादूर शाह पहिला (१६४३-१७१२) याच्यासोबत नांदेडमध्ये आले. बहादूर शाह पुढं गोवलकोंडा इथं गेला, तेव्हा गुरू गोविंदसिंग नांदेडमध्येच राहिले. याच गावात गुरू गोविंदसिंग यांनी घोषित केलं की, यापुढं शिखांचा गुरू कुणी माणूस नसेल, तर ग्रंथ हाच शिखांचा गुरू असेल. मी शेवटचा (दहावा) जिवंत गुरू आहे. आणि यापुढं आपला पवित्र ग्रंथ, गुरू ग्रंथसाहिब हा शिखांचं नेतृत्व करील. गुरू गोविंद सिंग यांचं निधन याच गावात झालं.
१७२५ मध्ये नांदेड हे हैदराबाद राज्याचं भाग बनलं. १८३५ मध्ये महाराजा रणजितसिंग यानं सिकंदर जाह (हैदराबादचा तिसरा निजाम) याच्या सहाय्यानं नांदेड इथं गुरुद्वाराचं बांधकाम सुरू केलं. गुरुद्वारा बांधण्याचा खर्च रणजितसिंग आणि निजाम यांनी मिळून केला. गुरुद्वारा गुरू गोविंदसिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर बांधला गेला. हा गुरुद्वारा आता हजूर साहिबचा भाग आहे.
१९४८ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी हैदराबादचा ताबा घेतला आणि ऑपरेशन पोलोमध्ये निजामाची राजवट संपवली. नांदेड नवीन हैदराबाद राज्याचा भाग बनलं. १९५६ पर्यंत नांदेड हे हैदराबाद राज्यातच होतं. नंतर ते मुंबई राज्यात घेण्यात आलं.
१ मे १९६० रोजी भाषिक आधारावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मराठीबहुल नांदेड जिल्हा महाराष्ट्राचा भाग झाला. डिसेंबर २०२२ मध्ये नांदेड जिल्ह्यातल्या २५ गावांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये विलीन होण्याची मागणी पुन्हा केली.
नांदेड शहराचं क्षेत्र ६३.२२ चौरस किलोमीटर आहे. नांदेड हे डेक्कन ट्रॅप्स लाव्हा प्रवाहाच्या वरच्या क्रिटेशस ते खालच्या इओसीन पृष्ठावर बांधलं गेलं आहे. लाव्हा प्रवाह पातळ गाळाच्या साठ्यांनी आच्छादित आहे. इथली माती मुख्यतः अग्नियुक्त खडकांपासून तयार होते आणि ती काळी, मध्यम काळी, उथळ आणि चुनखडीयुक्त प्रकारची असते.
नांदेड शहरातून गोदावरी नदी जाते. कापूस, केळी, ऊस, आंबा, सोयाबीन, गोड लिंबू, द्राक्षे, पपई आणि ज्वारी हे नांदेडच्या आसपास पिकतात. कापूस उत्पादक उद्योगाला चालना देण्यासाठी नांदेडमध्ये प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र आहे. परभणीच्या कृषी विदयापीठाच्या अंतर्गत एक कृषी शाळा कार्यरत आहे.
या जिल्ह्यात दर वर्षी एक कोटी पर्यटक येतात. त्यातले बहुतेक धार्मिक यात्रेकरू असतात. नांदेडला किल्ला आहे. त्याला नंदगिरी किल्ला असंही म्हणतात. हा गोदावरी नदीच्या काठावर आहे. गोदावरी नदीनं किल्ल्याला तीन बाजूंनी वेढलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किल्ल्याचं उद्यानात रूपांतर करण्यात आलं आहे. किल्ल्यात पाण्याची टाकी बांधलेली आहे.
गोदावरी नदीच्या घाटांवर धार्मिक विधी केले जातात. उर्वशी घाट, राम घाट,संत टेकडी नंदीतट आणि गोवर्धन घाट अशी त्यांची नावं आहेत.
जिल्ह्यात धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. कालेश्वर मंदिर, विष्णुपुरी, शनी मंदिर, मोंढा, याज्ञवल्क वेद पाठशाळा सरस्वती मंदिर, श्रीनगर, यादव अहिर समाज महामाई माता मंदिर,देवीनगर, गणपती मंदिर, त्रिकुट, हनुमान मंदिर, त्रिकुट, दत्त मंदिर, त्रिकुट, राजपूत संघ रेणुका माता मंदिर, माहूरगड, चालुक्य काळात बांधलेलं सिद्धेश्वर मंदिर, होट्टल, राजा सेनापती यानं धर्मग्रंथ प्रदर्शित करणाऱ्या मोठ्या दगडांनी बांधलेलं शिवमंदिर, ताडखेल, देगलूर तालुका, जगदंबा माता मंदिर, ताडखेल, नरसिंह मंदिर, जुन्ना कौठा, गुरुद्वारा हजूर साहिब, गुरुद्वारा नगिना घाट साहिब, गुरुद्वारा बंदा घाट साहिब, गुरुद्वारा शिकार घाट साहिब, गुरुद्वारा बाओली साहिब, गुरुद्वारा हिरा घाट, गुरुद्वारा माता साहिब, गुरुद्वारा माल टेकडी, गुरुद्वारा संगत साहिब, गुरुद्वारा नानकपुरी साहिब, गुरुद्वारा भजनगड साहिब, सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॅथोलिक चर्च, मेथोडिस्ट चर्च, बेथेल एजी चर्च, पेन्टेकोस्टल मिशन (चर्च), बेथेस्डा मंत्रालय चर्च.
नांदेडचा उल्लेख पहिल्या शतकापासूनच्या इतिहासात आढळतो. १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेनंतर, मुंबई राज्यातल्या नांदेड जिल्ह्यात कंधार, हदगाव, बिलोली, देगलूर, मुधोळ या सहा तालुक्यांचा समावेश झाला, तर मुखेड आणि भोकरला महाल (महसूल मुख्यालय) म्हटलं गेलं. १९६९ च्या राज्यांच्या पुनर्रचनेत देगलूर तालुक्यातलं बिचकुंडा, जुक्कल ही गावं तसंच संपूर्ण मुधोळ तालुका (धर्माबाद वगळून) तेलंगणातल्या निजामाबाद जिल्ह्यात विलीन करण्यात आला. त्यांच्या बदल्यात किनवट व इस्लापूर ही गावं आदिलाबाद जिल्ह्यापासून वेगळी करून नांदेड जिल्ह्याचा भाग बनवण्यात आली. इस्लापूर हे गाव किनवट तालुक्याला जोडून धर्माबाद हे गाव बिलोली तालुक्यात घेण्यात आलं.
नांदेड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ १०३३२ चौरस किमी आहे. नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या आणि मराठवाडा विभागाच्या पूर्व भागात आहे.
नांदेडच्या उत्तरेला विदर्भातला यवतमाळ जिल्हा, नैऋत्येला लातूर, पश्चिमेला परभणी आणि हिंगोली जिल्हा आहे. पूर्वेला तेलंगणा राज्यातले आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद आणि कामारेड्डी जिल्हे आहेत आणि दक्षिणेला कर्नाटक राज्याचं बीदर आहे. हे क्षेत्र असमान टेकड्या, पठार, हलके उतार आणि दऱ्यांचं आहे.
गोदावरी नदी जिल्ह्यातून वाहते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे दोन भाग पडतात. उत्तर आणि ईशान्येकडचा डोंगराळ प्रदेश आणि गोदावरी, मांजरा, मन्याड, पेनगंगा नद्यांच्या काठावरचा सखल भाग.
नांदेड जिल्ह्यातला माहूर किल्ला हा प्राचीन काळातला प्रमुख किल्ला होता. माहूरमध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे. हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे. माहूरमध्ये दत्त आणि परशुराम मंदिरं आहेत. माहूर किंवा मातापूर परिसरात पैनगंगा नदी तिन्ही बाजूंनी वाहते. नदी ओलांडून गेल्यावर दोन-चार मैलांवर डोंगराच्या पायथ्याशी माहूरक्षेत्र गाव लागतं. गावाच्या पार्श्‍वभूमीवर रेणुकामाता, दत्तात्रेय आणि अनसूया यांची शिखरं स्वतंत्रपणे उभी आहेत. माहूर डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं आहे. माहूर इथलं रेणुकादेवीचं मंदिर नांदेडमधलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. माहूर गावाच्या डोंगरावर हे मंदिर वसलेलं आहे. देवगिरीच्या यादव राजांनी हे मंदिर बांधलं होतं. हे मंदिर ८९९ वर्षं जुनं आहे. इथंच माहूर किल्ला आहे.
हदगाव तालुक्यातलं केदारगुडा मंदिर हे देवराईत (देवाला समर्पित जंगल) आहे. हे केदारनाथाचं मंदिर आहे. हदगाव तालुक्यातलं गायतोंड (गाईचं तोंड) इथलं आणखी एक प्राचीन मंदिर हे शिव तीर्थक्षेत्र आहे.
किनवटच्या इस्लापूर गावात सहस्रकुंड धबधबा आहे. इथल्या सल्फर आणि फॉस्फेट असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचं मानलं जातं. किनवट तालुक्यातल्या उनकेश्वर गावात शिवमंदिर आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अशोक चव्हाण, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सदतुल्ला हुसैनी, माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, माजी कुलगुरू व लेखक नागनाथ कोत्तापल्ले, लेखक दत्ता भगत, नरहर कुरुंदकर, कवी वा. रा. कांत याच जिल्ह्यातले.
नांदेड जिल्ह्यात नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, बिलोली, नायगाव, देगलूर, मुखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, माहूर, उमरी, लोहा हे तालुके आहेत.
अर्धापूर तालुक्यात ५६ गावं, ३९ ग्रामपंचायती व १ नगरपंचायत आहे. तालुक्यात प्रामुख्यानं कापूस, केळी, सोयाबीन आणि हळद ही पिकं घेतली जातात. अर्धापूर तालुक्यातली केळी प्रसिद्ध आहेत. नांदेड तालुक्याचं विभाजन करून हा अर्धापूर तालुका ३० डिसेंबर १९९९ रोजी तयार झाला. तालुक्यात मालेगाव इथं महारुद्र मारुती मंदिर, केशवराजाचा मठ, दाभडचं बुद्धविहार, पिंपळगावचं महादेव मंदिर, केळी संशोधन केंद्र प्रसिद्ध आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे. अर्धापूररात रसूल दर्गा आहे. इथं एका ठिकाणी २९ मीटर लांब कबर सापडली आहे. एवढी मोठी लांब कबर चमत्कार मानली जाते. (अशीच एक लांबलचक कबर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर इथं आहे.)
अर्धापूर तालुका नांदेड-नागपूर राज्य महामार्गावर नांदेडपासून २० किमी अंतरावर आहे. तालुक्यातलं एकूण जमीन क्षेत्र २६१५५ हेक्‍टर असून, प्रामुख्यानं पाटनूर, लहान आणि चेननपूर या तीन गावांमध्ये वनजमीन २११० चौ. किमी आहे. एक नदी आहे. इथं पाऊस ८७९ मिमी पडतो. तालुक्याचं एकूण क्षेत्रफळ २९,२१९ चौ.कि.मी. आहे. याच्या पूर्वेला भोकर तालुका, पश्चिमेला परभणी जिल्हा, दक्षिणेला नांदेड तालुका आणि उत्तरेला हदगाव तालुका आहे. या तालुक्यातलं केळी पीक महाराष्ट्रात लोकप्रिय आहे आणि कापूस, सोयाबीन ही खरीप, हरभरा, गहू ही रब्बी पिकं घेतली जातात. ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा नांदेड, अर्धापुरा, भोकर, मुदखेड या चार तालुक्यांतला ऊस घेतो.
भोकर शहर नांदेड जिल्ह्यातील नांदेडच्या पूर्वेला ५६ किमी अंतरावर आहे. आधी भोकर तालुक्याचा समावेश आंध्र प्रदेश राज्यातल्या मुधोळा जिल्ह्यात व्हायचा. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० मध्ये नांदेड जिल्ह्यात त्याचा समावेश करण्यात आला. भोकर तालुक्यातल्या काही गावांमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते.
भोकर तालुक्यात ४७४०९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यामध्ये कोरडवाहू क्षेत्र ४५३४५ हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र १०६४ हेक्टर आहे. तालुक्याचं वनक्षेत्र १२००४ हेक्टर आहे. तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक आहे. याशिवाय तूर, सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं घेतली जातात. याशिवाय हळद, केळी हेही सिंचनाच्या उपलब्ध क्षेत्रात घेतली जातात. भोकर तालुक्यात सरासरी ९९६.६९ मिमी पाऊस होतो.
भोकर तालुक्यात लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धानोरा, रेणापूर (सुधा), आमठाणा, भरभुशी असे तलाव आहेत. किणी, कांदळी, लेमकानी, ईलगाव, नांदा इथंही तलाव आहेत. त्यापैकी रेणापूर येथील सुधा प्रकल्प हा सर्वात मोठा असून त्यातून भोकर शहराला पाणीपुरवठा होतो.
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीची मशीद प्रसिद्ध आहे. तिचं नाव हजरत नवाब सरफराज खान शहीद मशीद आहे. ही ३३० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी मशीद आहे. हजरत नवाब सरफराज खान हे औरंगजेबाच्या सैन्यात अधिकारी होते. नांदेडमध्ये अशा काही मशिदी आहेत ज्या प्राचीन कला आणि स्थापत्यकलेची माहिती देतात आणि जगभरातले अनेक पर्यटक त्यांना भेट देतात. कंधार इथं हाजी सैय्या सरवर मगदुम दर्गा आहे. याला सय्यद सैदोदीन या नावानंही ओळखलं जातं. हा दर्गा ७५० वर्षांपूर्वीचा आहे.
उनकेश्वर मंदिर नांदेडच्या किनवटच्या उत्तरेला पेनगंगा नदीच्या जवळ आहे. त्यात सूर्य कुंड आणि मुख कुंड म्हणून ओळखले जाणारे गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांचं तापमान ३०°सेल्सिअस ते ४३°सेल्सिअस असतं.
सिद्धेश्वर मंदिर नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरपासून ८ किलोमीटर अंतरावर होट्टल इथं आहे. हे मंदिर दगडानं बांधलेलं आहे आणि भारताच्या प्राचीन शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण १५९५ गावं आहेत. हा जिल्हा कापूस, तेलबिया आणि अन्नधान्य, कडधान्य, गहू आणि ज्वारी यासारख्या पिकांचं उत्पादन करणारा कृषी जिल्हा आहे. इथं जिनिंग आणि प्रेसिंगसारखे उद्योग आहेत. वनस्पती तेल, डाळी दळणं यांच्या गिरण्या आहेत. नांदेडमध्ये कापूस सूत आणि विणकामाच्या गिरण्याही आहेत.
नांदेडचा खास खाद्यपदार्थ तेहरी आहे. हा भरपूर मसाले, भाज्या आणि मांस घालून शिजवलेला तांदूळ असतो. नांदेड हे बिद्री वर्कसारख्या हस्तकलेसाठीदेखील लोकप्रिय आहे, ज्यात प्लेट्स, वाट्या, भांडी, सिगारेट होल्डर, चाकू, खंजीर, तलवारी इत्यादींवर बारीक नक्षीकाम केलं जातं.
यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या मध्ये पैनगंगा वन्यजीव अभयारण्य आहे. हे पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंना आहे. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली.
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, मांजरा, पेनगंगा आणि मानार या आहेत. समुद्रसपाटीपासून नांदेड शहराची उंची ४८९ मीटर आहे.
नांदेड हे महाराष्ट्रातल्या इतर शहरांशी रस्त्यानं जोडलेलं आहे. शहरात विमानतळ आहे, पण सध्या सुरू नाही. शीख यात्रेकरूंसाठी नांदेड हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. जिल्ह्यात एकूण बारा गुरुद्वारा आहेत. नांदेड रेल्वे स्थानक भारतातल्या मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, कोलकाता, अमृतसर, भोपाळ, इंदूर, आग्रा, हैदराबाद, जयपूर, अजमेर, औरंगाबाद, नाशिक या शहरांशी जोडलेलं आहे.
नांदेड जिल्ह्यात मुदखेड हे शहर व नगरपरिषद आहे, तालुक्याचं गाव आहे. मुदखेड हे तीन रेल्वे मार्गांचं जंक्शन आहे. एक ब्रॉडगेज लाइन मुंबईला जाते, एक ब्रॉडगेज लाइन नागपूरला जाते आणि दुसरी ब्रॉडगेज सिकंदराबादला जाते. मुदखेड नांदेडपासून पूर्वेला २४ किमी (१५ मैल) अंतरावर आहे. इथं सीआरपीएफ ट्रेनिंग कॉलेज आहे. याची स्थापना सप्टेंबर १९९६ मध्ये शंकरराव चव्हाण यांनी केली. मुदखेड तालुक्यात ६५ गावं आणि ५१ पंचायतींचा समावेश आहे. अमरापूर (दुधनवाडी) हे सर्वात लहान गाव आणि बरड हे सर्वात मोठं गाव आहे.
मुदखेडमध्ये गुलाब, मोगरा, काकडा यासह विविध फुलांचं उत्पादन घेतलं जातं. केळी आणि ऊसही घेतला जातो. पण इथलं फुलांचं उत्पादन प्रसिद्ध आहे.
किनवट नांदेड जिल्ह्यातलं नगरपरिषद असलेलं आणि तालुक्याचं गाव आहे. १९०५ मध्ये आदिलाबाद जिल्ह्यातली नरसापूर, तामसी आणि निर्मल तालुक्यांतली अनेक गावं एकत्र करून किनवट तालुका अस्तित्वात आला. पूर्वी ही गावं हैदराबाद विभागांतर्गत होती. किनवट हे नांदेड शहरापासून १२५ किमी अंतरावर आहे. पेनगंगा नदी गावाच्या बाजूनं वाहते तर नागझरी धरण गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या रहिवाशांसाठी धरण हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. नव्या वसाहती वाढत आहेत, आणि लोक जमिनीखालच्या पाण्याचा बेसुमार उपसा करत आहेत. त्यामुळं लवकरच इथलं जमिनीखालचं पाणी संपण्याचा धोका आहे.
किनवटमध्ये विस्तीर्ण जंगलं आहेत.
मुखेड ही नांदेड जिल्ह्यातली एक नगरपरिषद आणि तालुका आहे. या शहराचं ऐतिहासिक नाव मोहनावती नगर होतं. मोहनावती या नावाचा अर्थ जादूगार. लोक या गावात आले की, गावाची जादू त्यांच्यावर होईल आणि ते मंत्रमुग्ध होतील अशी दंतकथा आहे. शहराचं सध्याचं नाव मुखेड आहे.
मुखेड इथं शिवपुत्र वीरभद्र याचं मंदिर आहे. वीरभद्र ग्रामदैवत आहे. दुसरं मंदिर दशरथेश्वराचं आहे. हे विक्रमादित्य चालुक्याच्या काळात १२ व्या शतकात बांधलं गेलं.
देगलूर हे भारताच्या नांदेड जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. हा नांदेडचा सर्वात मोठा तालुका आहे आणि त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासासाठी ओळखला जातो. हे शहर पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होतं. हे शहर लेंडी नदीवर वसलेलं आहे. देगलूर हे प्राचीन काळापासून बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त तेलंगणातील बहुतेक लोक त्यांच्या अत्यावश्यक सेवांसाठी, विशेषत: वैद्यकीय सेवांसाठी या गावात येतात. देगलूर हे तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमांच्या जवळ वसलेलं आहे. त्यामुळं इथले लोक मराठीसह अस्खलित तेलुगू आणि कन्नड बोलू शकतात. इथं प्रामुख्यानं ऊस, कापूस, धान्य आणि केळी ही पिकं घेतली जातात. हे शहर कापड बाजार आणि सोन्याच्या दागिन्यांसाठीदेखील ओळखलं जातं. इथं निजामानं बांधलेला सुंदर रामपूर तलाव आहे. जवळच होट्टल मंदिर आहे. जमिनीत धसत चाललेलं एक विष्णुमंदिरही होट्टलमध्ये आहे. कराडखेड धरण देगलूर शहराजवळ आहे.
नायगाव नांदेड जिल्ह्यातलं एक शहर व तालुका आहे. याची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शेती आणि शेतीसंबंधित व्यवसायांवर आधारित आहे.
हदगाव हे नांदेड जिल्ह्यातलं एक शहर व नगरपरिषद आहे. तालुका आहे. केदारनाथ मंदिर या शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर केदारगुडा गावात आहे. दत्त बर्डी इथं दत्त आणि रेणुका यांची मंदिरं आहेत. जुन्या शहरात उखळाई आश्रम, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या कार्यकर्त्यांचं हदगाव हे प्रमुख ठिकाण होतं. त्याची सरासरी उंची १८९९ मीटर आहे.
हिमायतनगर हा नांदेड जिल्ह्याचा एक तालुका बव्हंशी वनक्षेत्रानं व्यापलेला आहे. इथं नगरपरिषद आहे
लोहा हे नांदेड जिल्ह्यातलं नगरपरिषद असलेले शहर आहे. लोहा आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. नांदेडपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या लोहा तालुक्यातल्या मालेगाव या गावात खंडोबाची मोठी यात्रा भरते. मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे. जुन्या काळातला एक किल्लाही इथं आहे.
लोहा तालुक्यात नागबर्डी हे गाव आहे. या गावात कडुलिंबाची खूप झाडं आहेत. या गावात कडुलिंबाचं झाड कधीही तोडलं जात नाही. त्यामुळं या गावाला ऑक्सिजनचं गाव म्हटलं जातं.
कंधार हे नांदेड जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक शहर आणि नगरपरिषद आहे. तालुका आहे. कंधार मन्याड जलाशयाच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. कंधार हे राष्ट्रकूट राज्यातलं प्रमुख जैन केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. त्याची राजधानी मालखेड किंवा मन्याखेत होती. कंधार भुईकोटाजवळ क्षेत्रपालाची (जैनांशी संबंधित देवता) एक मोठी मूर्ती आढळते. मूर्ती तुटलेली आहे, पण तिच्या पायाच्या नखावरून तिची उंची ५० फुटांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. सध्या कंधारमध्ये जुनं दिगंबर जैन मंदिर आहे. कंधार भुईकोट किल्ल्यासाठीही प्रसिद्ध आहे. २६४९ मध्ये शहाजहानच्या ताब्यात हा भाग होता. औरंगजेबानं साठ हजार घोडदळ आणि दहा हजार पायदळ घेऊन हा भाग जिंकला होता. पाठवले.
कंधारचा किल्ला नांदेड शहरापासून ५८ किमी अंतरावर मन्याड नदीच्या खोऱ्यात बालाघाट पर्वतराजीच्या उतारावर वसलेला आहे. चौथ्या शतकात काकतिय राजघराण्यानं कंधार किल्ला बांधला आणि त्याची राजधानी केली. ती नंतरच्या राष्ट्रकूटांचीही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर शहराची स्थापना केली आणि जगत्तुंग समुद्र नावाचा एक तलाव तयार केला. राष्ट्रकूटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग म्हणून ओळखला जात असे.
धर्माबाद हे नांदेड जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. तालुक्याचं गाव आहे. हे तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ आहे. धर्माबादची सरासरी उंची ३५९ मीटर आहे. ते रेल्वेनं जोडलेलं आहे. १९७७ मध्ये इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. धर्माबाद हे दक्षिण मध्य रेल्वेचं सर्वात मोठं उत्पन्न देणारं स्टेशन आहे.
धर्माबादची लाल मिरची प्रसिद्ध आहे. तिचा उपयोग खास करून तिखट बनवण्यासाठी केला जातो. धर्माबादच्या आसपासच्या परिसरात लाल तिखट आणि लाल पावडर निर्मिती उद्योग प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळं इथं मिरची लागवडीखालचं क्षेत्र वाढत चाललं आहे. धर्माबाद ही लाल मिरचीची बाजारपेठ आहे.

भौगोलिक स्थान

  • उत्तर अक्षांश – १८.१६’ ते १९.५५’
  • पूर्व रेखांश – ७६.५५’ ते ७८.१९’
  • तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :- किमान – ५.६, कमाल – ४८.५

क्षेत्रफळ

  • एकूण जमिनीचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी. मध्ये) –  १०५२८

प्रशासन

  • उप विभागीय कार्यालये –  ८
  • तहसील कार्यालये  – १६
  • पंचायत समिती   –  १६
  • एकूण ग्राम पंचायत  –  १३०९
  • एकूण गावे – १६०३

लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या : – ३३६१२९२
    • ग्रामीण – २४४७३९४
    • नागरी – ९१३८९८
  • स्त्री व पुरुष लोकसंख्या :- स्त्री – १६३१२१७ , पुरुष – १७३००७५
  • स्त्री-पुरुष प्रमाण :- ९४३ स्त्री प्रती १००० पुरुष
  • लोकसंख्येची घनता  :- ३१९ व्यक्ती प्रती चौ.कि.मी.

साक्षरता

  • एकूण शेकडा टक्केवारी :-  ७५.४५  (पुरुष – ८४.२७,  स्त्री – ६६.१५)